मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांना मोठी आणि आनंदाची भेट दिली आहे. देशातील विविध शहरांमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाने तब्बल सात नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यापैकी दोन गाड्या भुसावळमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे धावणार असल्याने जळगाव, भुसावळ आणि खान्देशातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
या नव्या सेवांमध्ये प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सुभेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन महत्त्वाच्या अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या या रेल्वे सेवांमुळे भुसावळ जंक्शनचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
प्रयागराज–मुंबई अमृत भारत एक्सप्रेस
प्रयागराज ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला साप्ताहिक सेवेची मंजुरी देण्यात आली आहे. ही गाडी सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याण यांसारख्या प्रमुख स्थानकांवरून धावणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसोबतच खान्देशातील प्रवाशांना मुंबई गाठण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
सुभेदारगंज–मुंबई अमृत भारत एक्सप्रेस
सुभेदारगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेला आता अमृत भारत एक्सप्रेस म्हणून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक 14121 आणि 14122 या क्रमांकाने ही सेवा धावणार असून, सुभेदारगंजहून आठवड्यातून दोन दिवस आणि मुंबईहूनही आठवड्यातून दोन दिवस सेवा उपलब्ध होणार आहे.
या गाडीला फतेहपूर, गोविंदपुरी, बांदा, चित्रकूट धाम, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खांडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे अशी महत्त्वाची स्थानके प्रस्तावित आहेत.
खान्देशासाठी मोठा फायदा
अमृत भारत एक्सप्रेसमध्ये प्रामुख्याने नॉन-एसी डबे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्याचा प्रवास करता येणार आहे. भुसावळमार्गे या गाड्या सुरू झाल्याने जळगाव, भुसावळ आणि परिसरातील प्रवाशांना मुंबई, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
भुसावळ हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असल्याने नव्या अमृत भारत एक्सप्रेसमुळे या स्थानकाचे महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता या सेवांमुळे खान्देशातील रेल्वे वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment
0 Comments