Type Here to Get Search Results !

समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा; ओव्हरस्पीडला २ हजार, जड वाहनांना ४ हजारांचा दंड

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



समृद्धी महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता अत्याधुनिक यंत्रणेद्वारे नजर ठेवण्यात येणार असून, ओव्हरस्पीडसह विविध वाहतूक नियमभंगासाठी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी दर एक किलोमीटर अंतरावर डाव्या आणि उजव्या बाजूला आलटून-पालटून ‘झिगझॅग’ पद्धतीने हाय-प्रोफाइल सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.


हे अत्याधुनिक कॅमेरे उच्च क्षमतेचे असून, रात्रीच्या अंधारात तसेच धुक्याच्या परिस्थितीतही वाहनांची नंबर प्लेट, चालक आणि वाहनाच्या हालचाली स्पष्टपणे टिपण्याची क्षमता या यंत्रणेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महामार्गावर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे अधिक सुलभ होणार आहे.


समृद्धी महामार्गावर वाहनांच्या प्रकारानुसार वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कार आणि हलक्या वाहनांसाठी ताशी १२० किलोमीटर, बससाठी ताशी १०० किलोमीटर, तर जड वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर अशी वेगमर्यादा आहे. निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या कार आणि हलक्या वाहनांना २ हजार रुपये, तर जड वाहनांना ४ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.


याशिवाय वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर न केल्यास १ हजार रुपये, तर लेन कटिंग केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कॅमेऱ्यात नियमभंगाची नोंद होताच संबंधित वाहनाची माहिती संकलित करून वाहनचालकाला थेट मोबाइलवर ई-चलान पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.


विशेष म्हणजे, एखाद्या वाहनचालकावर दोन वेळा दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही त्याने तिसऱ्यांदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या चालकांवर केवळ आर्थिक दंडाची कारवाई न करता कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची तयारी करण्यात आली आहे.


‘झिगझॅग’ पद्धतीने बसविण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष अद्याप निश्चित करण्यात आलेले नसून, तो ठाणे किंवा नागपूर येथे असण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली नोव्हेंबर महिन्यापासून पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.


या यंत्रणेमुळे समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा, लेन शिस्त आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत अधिक काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. वाहनचालकांनी महामार्गावर निर्धारित वेगमर्यादा पाळून, लेन शिस्तीचे पालन करावे आणि सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments