मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चाळीसगाव : चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) विजयकुमार ठाकूरवाड यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट पोलीस सेवेला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मोठा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. या सन्मानामुळे चाळीसगाव विभागासह जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या पदकाचा स्वीकार करताना डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर उपस्थित होते. मान्यवरांनी ठाकूरवाड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे अधिकारी म्हणून लौकिक
विजयकुमार ठाकूरवाड यांनी पोलीस सेवेत काम करताना कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याला प्राधान्य दिले आहे. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती, प्रसंगावधान, धाडसी निर्णयक्षमता आणि सामान्य नागरिकांशी असलेला संवेदनशील संवाद ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात.
पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करतानाच मानवी दृष्टिकोनही जपला. विविध आव्हानात्मक परिस्थितींमध्ये शांतपणे परिस्थिती हाताळण्याची त्यांची क्षमता आणि वरिष्ठ अधिकारी, सहकारी तसेच नागरिकांमध्ये निर्माण केलेला विश्वास यामुळे त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली गेली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेला हा अतिउत्कृष्ट सेवा पदक त्यांच्या सेवाभावाची आणि कार्यक्षमतेची अधिकृत पावती मानली जात आहे. हा सन्मान केवळ ठाकूरवाड यांचा वैयक्तिक गौरव नसून त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या या यशामुळे चाळीसगाव विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली असून, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक सेवेला मिळालेली ही दाद निश्चितच कौतुकास्पद आहे.
विजयकुमार ठाकूरवाड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Post a Comment
0 Comments