Type Here to Get Search Results !

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांना रविवारी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिक शहरापासून सुमारे ५३ किलोमीटर अंतरावर असल्याचे समोर आले आहे.


नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, पेठ, कळवण, चांदवड, देवळा यांसह विविध ग्रामीण भागात भूकंपाचे हादरे जाणवले. प्रसिद्ध सप्तश्रृंगी गड परिसरातही धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय नाशिक शहरातील इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी पाडा आदी भागातील नागरिकांनीही भूकंपाचे हादरे जाणवल्याचे सांगितले.


ग्रामीण भागातील काही ठिकाणांपासून कसारा घाट ते रामशेत किल्ला परिसरापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. धक्क्यांची तीव्रता तुलनेने कमी असली तरी अचानक जाणवलेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेक नागरिकांनी घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला.


आठवडाभरापासून अधूनमधून धक्के


नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या आठवडाभरापासून अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याची माहिती आहे. रविवारी पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


भूकंपाच्या वेळी घ्या ‘ही’ काळजी


भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी घाबरून धावपळ करू नये. घरामध्ये असल्यास खिडक्या, काचा, कपाटे तसेच जड वस्तूंपासून दूर राहावे. शक्य असल्यास मजबूत टेबल किंवा अन्य सुरक्षित संरचनेखाली आसरा घ्यावा. धक्के सुरू असताना लिफ्टचा वापर करू नये. तसेच तातडीने बाहेर पडण्यासाठी जिन्यात किंवा दरवाजाजवळ गर्दी करू नये.


धक्के थांबल्यानंतर इमारतीपासून सुरक्षित अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेत जावे. विजेच्या तारा, झाडे, भिंती आणि धोकादायक बांधकामांपासून दूर राहावे. घरातील गॅस, वीज याबाबतही आवश्यक ती खबरदारी घ्यावी.


अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


भूकंपाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आणि अप्रमाणित माहिती पसरू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये किंवा अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये. प्रशासन आणि अधिकृत यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचेच पालन करावे.


लहान मुले, ज्येष्ठ व दिव्यांगांची विशेष काळजी


भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता राखून एकमेकांना सहकार्य करावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून अधिकृत सूचनांचे पालन करावे. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Post a Comment

0 Comments