Type Here to Get Search Results !

चोपडा शहरात गोवंश मांस विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; ८० किलो मांसासह ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



चोपडा  : चोपडा शहरातील शेतपुरा परिसरात प्रतिबंधित गोवंश मांसाची कथित विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ८० किलो गोवंश जातीचे मांस, लोखंडी वजनकाटा तसेच मांस कापण्यासाठी वापरली जाणारी धारदार हत्यारे असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियमाच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील शेतपुरा परिसरातील कुरेशी मोहल्ल्यात प्रतिबंधित मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची कारवाई सुरू होताच परिसरात काही काळ खळबळ उडाली.


छाप्यादरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे मांस आढळून आले. त्याचबरोबर मांसाचे वजन करण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी वजनकाटा, मांस कापण्यासाठी वापरले जाणारे दोन धारदार लोखंडी सुरे आणि धारदार पात्याची लोखंडी कुऱ्हाड असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून संबंधित साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.


या प्रकरणी शेख इलियास शेख इस्माईल कुरेशी (४४), शेख नईम शेख मेहमूद कुरेशी (४९), शेख रईस शेख इस्माईल (३६) आणि शेख तोफिक शेख हनीफ कुरेशी (२५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित मांसाची विक्री करीत असल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


पोलीस शिपाई निलेश कैलास वाघ यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मधील सुधारित तरतुदींनुसार कलम ५, ५(अ), ५(क) आणि ९(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


या कारवाईचे काही गोभक्त आणि गोरक्षकांकडून स्वागत करण्यात आले आहे. शहरात प्रतिबंधित मांसाच्या कथित अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने संबंधितांमध्येही खळबळ उडाली आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार प्रदीप पवार करीत असून, कारवाईत सहभागी पोलीस पथकाकडून प्रकरणातील इतर बाबींचाही तपास केला जात आहे.

Post a Comment

0 Comments