Type Here to Get Search Results !

चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला हंगामातील सर्वोच्च ३ हजार ७२५ रुपयांचा भाव

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



चाळीसगाव चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या कांदा हंगामातील सर्वोच्च भावाची नोंद झाली असून, कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार ७२५ रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. पाटणा येथील शेतकरी पिंटू शशिकांत आव्हाड यांच्या कांदा शेतमालाला हा सर्वोच्च भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.


चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय सन २०१६ मध्ये घेण्यात आला होता. बाजार समितीच्या सर्व संचालकांनी एकमताने निर्णय घेत कांदा मार्केट सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत चाळीसगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी हक्काचे बाजारपेठ उपलब्ध झाली असून, बाजार समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल आणि रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत.


यंदाच्या हंगामात कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत असताना चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला मिळालेल्या ३ हजार ७२५ रुपयांच्या सर्वोच्च दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाटणा येथील शेतकरी पिंटू शशिकांत आव्हाड यांनी बाजार समितीत विक्रीस आणलेल्या कांदा शेतमालाला हा दर मिळाला. दत्त कंपनीने हा कांदा खरेदी केला. यंदाच्या हंगामातील कांद्याला मिळालेला हा सर्वोच्च भाव असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.


कांद्याला मिळालेल्या चांगल्या दरामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक, बियाणे, खते आणि इतर शेतीच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर कांद्याला चांगला भाव मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे बाजार समितीत मिळालेला हा दर कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक मानला जात आहे.


चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी रोख हिशोब व्यवस्था आणि चोख वजनमापाची सुविधा उपलब्ध असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कांदा शेतमालाची विक्री करण्यासाठी चाळीसगाव बाजार समितीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


बाजार समितीचे सभापती किशोर पाटील, उपसभापती राहुल पाटील तसेच सर्व संचालकांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीस आणण्याचे आवाहन केले आहे. कांद्याला मिळालेल्या या सर्वोच्च दरामुळे आगामी काळातही शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments