Type Here to Get Search Results !

तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड; देवझिरी शिवारात पोलिसांची धडक कारवाई

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283




चोपडा तालुक्यातील देवझिरी गावातील शेतशिवारात तुरीच्या पिकाआड गांजाची अवैध लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, देवझिरी गावातील एका शेतशिवारात तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी कारवाईची तयारी केली. डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ८ सप्टेंबर रोजी संबंधित शेतात छापा टाकला.


पोलिसांनी शेताची बारकाईने पाहणी केली असता तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून गांजाची १७५ झाडे जप्त केली. या प्रकरणात देवसिंह बरेला याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


विशेष म्हणजे, गांजाची लागवड करण्यात आलेले शेत मध्य प्रदेशाच्या सीमेलगतच्या परिसरात असल्याची माहिती आहे. सीमावर्ती भागात अमली पदार्थांच्या अवैध हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष सतर्कता बाळगली जात आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध अमली पदार्थांच्या व्यवहारांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, या गांजाच्या लागवडीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, लागवडीसाठी साहित्य किंवा बियाणे कुठून आणण्यात आले, तसेच या प्रकरणाचे अन्य काही धागेदोरे आहेत का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपासातून या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments