Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या नावाने बनावट Instagram खाते? नशिराबादच्या होमगार्ड जवानाची चेन्नई पोलिसांकडून चौकशी

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



नशिराबाद येथील ताज नगर परिसरातील एका होमगार्ड जवानाची चेन्नई वेस्ट झोन पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या नावाने कथित बनावट Instagram खाते तयार करून त्यावर अश्लील व आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चेन्नई वेस्ट झोन पोलिसांचे पथक नशिराबाद येथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील ताज नगर परिसरात राहणारे होमगार्ड जवान मोहम्मद जुनेद शेख कुदबुद्दीन यांची या प्रकरणात चौकशी सुरू आहे. स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरील फॉलोअर्सची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीने मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या नावाने कथित बनावट Instagram खाते तयार केले असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या बनावट खात्यावर अश्लील तसेच आक्षेपार्ह स्वरूपाच्या पोस्ट शेअर करण्यात आल्याने संबंधित प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणातील सोशल मीडिया खाते, त्यावरून करण्यात आलेल्या पोस्ट तसेच त्या खात्याचा प्रत्यक्ष वापर कोणी केला, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

दरम्यान, या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन पोलिसांचे पथक नशिराबाद येथे आले असून, संबंधित होमगार्ड जवानाची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचे बँकेचे पासबुक ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत असून, आर्थिक व्यवहारांमध्ये कोणताही संशयास्पद अथवा गैरप्रकार झाला आहे का, याची पडताळणी केली जात आहे.

या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार असून, बनावट खाते कोणी आणि नेमक्या कोणत्या उद्देशाने तयार केले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून डिजिटल पुरावे व इतर बाबींची तपासणी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments