Type Here to Get Search Results !

सरपंच निवडीची पद्धत बदलणार; थेट जनतेतून नव्हे, निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



मुंबई : महाराष्ट्रातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरपंच निवडीच्या पद्धतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायतीचा सरपंच थेट जनतेतून निवडण्याऐवजी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात 2017 पासून सरपंचाची निवड थेट जनतेतून होत आहे. 


या निर्णयासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये कलम 7, 13, 15, 35, 38, 43, 62 आणि 62अ यांचा समावेश असून, कलम 30-अ-1ब आणि कलम 145-1अ यांचा नव्याने समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. संबंधित कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


निवडणुकीनंतर सदस्यांमधून निवड

सध्याच्या पद्धतीनुसार ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांसोबत सरपंच पदासाठीही थेट मतदान होते. मात्र प्रस्तावित नव्या पद्धतीत प्रथम ग्रामपंचायत सदस्य निवडून येतील. त्यानंतर या निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत बदल होणार आहे.

दरम्यान, सरपंचाची निवड थेट जनतेतूनच व्हावी, यासाठी राज्यातील जवळपास एक हजारांहून अधिक ग्रामपंचायतींनी 26 जानेवारी रोजी ठराव मांडल्याचा दावा करण्यात आला होता. आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच निवडीची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबवली जाणार, याकडे ग्रामस्थ आणि स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यातील सुधारणा आणि त्यानंतरची अधिकृत अधिसूचना महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अंतिम प्रक्रिया शासनाच्या अध्यादेशानंतर स्पष्ट होईल.

Post a Comment

0 Comments