मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
वरणगाव : प्रेमविवाहाच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात एका तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेशी संबंधित दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरूनही चौघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमविवाहाच्या कारणावरून वाद
वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ संजय माळी (वय २४, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या प्रेमविवाहाच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच वादातून १२ ऑक्टोबर रोजी रात्री सिद्धेश्वर नगर परिसरातील कमानीजवळ संशयितांनी गोपाळ माळी यांचे भाऊ कृष्णा संजय माळी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी रॉडचा वापर करून कृष्णा यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आठ संशयितांविरुद्ध गुन्हा; तिघांना अटक
गोपाळ माळी यांच्या तक्रारीवरून सोपान पंडित धनगर, पवन संजय धनगर, धीरज संजय धनगर, निर्मलाबाई बापू धनगर, मिराबाई संजय धनगर, सागर बापू धनगर, मयूर भागवत धनगर आणि निलेश राखुंडे या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सागर, पवन आणि धीरज धनगर यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.
दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरूनही गुन्हा
दरम्यान, याच प्रकरणात दुसऱ्या गटाकडूनही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पवन संजय धनगर (वय २३, रा. सिद्धेश्वर नगर) यांच्या फिर्यादीवरून हर्षल राजपूत, कृष्णा संजय माळी, गोपाळ संजय माळी आणि शुभांगी गोपाळ माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संशयितांनी फिर्यादी पवन धनगर आणि त्यांच्या भावाला फायटर तसेच स्टीलच्या कड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या दुसऱ्या प्रकरणाचा तपास ग्रेडेड उपनिरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
दोन्ही गटांच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि दोन्ही बाजूंच्या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

Post a Comment
0 Comments