मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
नशिराबाद : शहरातील ताजनगर परिसरात हातात उघडी तलवार घेऊन फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला नशिराबाद पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले. शेख अल्ताफ शेख रऊफ (वय २८, रा. ख्वाजा गरीब नगर, नशिराबाद, ता. जि. जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ३३ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त केली असून, या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ताजनगर परिसरात एक तरुण हातात उघडी तलवार घेऊन फिरत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
या माहितीची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित परिसरात पंचांसमक्ष सापळा रचला. यावेळी मिळालेल्या माहितीतील वर्णनाशी मिळताजुळता एक तरुण हातात उघडी तलवार घेऊन फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला जागीच ताब्यात घेतले.
३३ इंचांची तलवार जप्त
ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख अल्ताफ शेख रऊफ असे सांगितले. त्याच्याकडून मूठ असलेली, जुनी वापरती लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या तलवारीची लांबी सुमारे ३३ इंच असून, तिची अंदाजे किंमत १ हजार १०० रुपये असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी उघडे शस्त्र घेऊन फिरण्याच्या प्रकारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी तातडीने केलेल्या या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक फौजदार राजेश मेंढे, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील व प्रशांत विरणारे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण लोहार, प्रकाश कोळी, परत बाविस्कर, समीर सैयद, पंकज सोनवणे आणि सागर बिडे यांचा समावेश होता.
नशिराबाद पोलिसांच्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.

Post a Comment
0 Comments