Type Here to Get Search Results !

चाळीसगावात भरदिवसा घरफोडी; सहा लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



६ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरीस; लक्ष्मीनगर परिसरातील घटनेने खळबळ


चाळीसगाव : शहरातील लक्ष्मीनगर परिसरात भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सहा लाख रुपयांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. घरातील सदस्य बाहेर गेले असल्याची संधी साधून चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून रोकड आणि दागिने लंपास केले. या प्रकरणी रोशन धरमचंद ताथेड (वय ४३) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घरातील सदस्य बाहेर जाताच साधली संधी


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोशन ताथेड यांचे गणेश क्रॉस रोड येथे वर्धमान बिल्डिंग मटेरियल नावाचे बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान आहे. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते घरातून दुकानावर गेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी राणी ताथेड या दुपारी ३.१५ वाजता घरी आल्या. त्यांनी जेवण केल्यानंतर दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडून समोरील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात गेल्या होत्या.


दरम्यान, घरातील सदस्य बाहेर असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराला लक्ष्य केले. घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाट उघडून त्यातील साहित्याची उचकापाचक केली.


कपाटातील रोकड आणि दागिने चोरीस


राणी ताथेड या दुपारी ४.२९ वाजता घरी परतल्या असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील लाकडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच कपाटाचे ड्रॉवर तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.


घरातील वस्तूंची तपासणी केली असता बांधकाम साहित्य विक्रीतून मिळालेली सुमारे सहा लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळले. याशिवाय १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मोतीहार, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीची समई आणि चांदीचा दिवा असा ऐवजही चोरीस गेला. चोरीस गेलेल्या रोकड आणि दागिन्यांची एकूण किंमत ६ लाख ४५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


चाळीसगाव शहर पोलिसांकडून तपास सुरू


घटनेनंतर रोशन धरमचंद ताथेड यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घरफोडीमागे कोणाचा हात आहे, तसेच चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत आहेत.


लक्ष्मीनगर परिसरात भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील सदस्य बाहेर असताना घराच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments