Type Here to Get Search Results !

खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार; आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा

मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक 


भाजपाच्या संसदरत्नांचा अभिमान 

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कर्मठ, अभ्यासू आणि जनतेशी सदैव बांधिलकी जपणाऱ्या खासदार स्मिताताई उदय वाघ यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांच्या या गौरवाबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी संसद सदस्यांच्या कार्यक्षमतेचा गौरव करण्यासाठी संसद रत्न पुरस्कार दिला जातो. यंदा हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवडलेल्या १७ खासदारांमध्ये स्मिताताईंचाही समावेश झाला आहे. ही निवड पक्षभेद बाजूला ठेवून गुणवत्तेवर आधारित असते.


स्मिताताईंनी लोकसभेमध्ये विविध मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले असून, विकासकामांबाबत त्यांची भूमिका ठाम आणि स्पष्ट राहिली आहे. महिला सबलीकरण, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रात त्यांनी जळगाव जिल्ह्यासाठी भरीव पाठपुरावा केला आहे. आपल्या कार्यशैलीत पारदर्शकता, सजगता आणि संवादाची ओळख त्यांनी निर्माण केली आहे.


या पुरस्कारामुळे केवळ स्मिताताईंच्या कार्याचा गौरव झाला नसून, जळगाव जिल्ह्याचेही नाव संपूर्ण देशात उजळले आहे. हा सन्मान नव्या पिढीतील लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा ठरेल.

Post a Comment

0 Comments