मुख्य संपादक:- सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क करा:- 9273165283
धरणगाव
तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून विक्री करणाऱ्या तरुणाविरोधात अन्न व औषध प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ८० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले असून, सोमनाथ आनंदा माळी (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भवरखेडा येथे आरोपी माळी हा आरोग्यास अपायकारक रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करत होता आणि राजरोसपणे विक्री करत होता. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांना मिळाल्यानंतर त्यांनी धरणगाव पोलिसांना सूचित केले. त्यानंतर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून माळीच्या घरातून भेसळीसाठी लागणारी रसायने आणि उपकरणे जप्त केली. चौकशीत त्याने दूध भेसळ करण्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी साळुंखे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
लोकांची बदलती मानसिकता चिंताजनक...
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर समाजाच्या आरोग्याशी खेळणारी एक विकृत वृत्ती आहे. काही जण आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासही मागेपुढे पाहत नाहीत.
दुधासारख्या पोषणद्रव्यामध्ये भेसळ करणे म्हणजे निष्पाप बालकांपासून वृद्धांपर्यंत साऱ्या समाजाला धीम्या विषप्रभावात ढकलण्यासारखे आहे. अशा घटना पाहता लोकांची मानसिकता दिवसेंदिवस घातक व असंवेदनशील होत चालली आहे, ही गोष्ट अत्यंत चिंतेची बाब आहे.
दूध भेसळीच्या घटना सुरूच...
जिल्ह्यात याआधीही काही खासगी डेअऱ्यांवर छापे टाकून दूध नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. दोषी आढळलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली असली तरी, दूध भेसळीचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
या संयुक्त कारवाईमुळे अशा विकृत प्रवृत्तींचा पर्दाफाश झाला असून, गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर साळुंखे, तसेच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर तातडीने पाऊल उचलून एका गंभीर आरोग्यसंकटाला रोखले, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे आणि अन्न भेसळीविरुद्ध ठाम भूमिका घेणे ही काळाची गरज बनली आहे. नागरिकांनीदेखील सतर्क राहून अशा प्रकारांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

Post a Comment
0 Comments