मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिराती साठी संपर्क करा:-9273165283
चाळीसगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शहरातील पाणी निचऱ्याची व्यवस्था कोलमडली असून, आनंदवाडी परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे व गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आज सकाळी ९ वाजता रात्रभर पाण्यात अडकलेल्या आनंदवाडीतील नागरिकांनी महाराणा प्रताप चौकात रस्ता रोको आंदोलन केले. आकाश पोळ, काका घोडे, बापू निकम, गुलाब वडार, रवींद्र निकम यांच्यासह परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला.
नागरिकांनी पालिकेवर निष्क्रियतेचा आरोप करत म्हटले की, "पालिका कर्मचारी वेळेवर गटारी स्वच्छ करत नाहीत. नाले तुंबलेले आहेत. त्यातून पाणी बाहेर निघत नाही आणि घरात शिरते."
रेल्वे पुलाखाली असलेल्या नाल्याच्या पाईपात घाण अडकल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि घरात शिरले. प्रशासनाने फक्त एका बाजूला पाईप टाकून निचऱ्याची सोय केली, मात्र दुसऱ्या बाजूस दुर्लक्ष केल्याने साचलेल्या पाण्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
मुख्याधिकारी सौरभ जोशी व पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, गायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संध्याकाळी मुख्याधिकारी यांनी सांगितले की, "आनंदवाडी परिसर हा उतारावर असल्यामुळे सर्व पाणी या भागात जमा होतो. लवकरच पाण्याचा निचरा होईल, यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या जातील."

Post a Comment
0 Comments