मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
चुंचाळे फाट्याजवळ दुचाकीस्वाराला चाकूचा धाक, परिसरात खळबळ
यावल तालुक्यातील चोपडा–यावल राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा घडलेल्या लूटमारीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चुंचाळे फाट्याजवळ दोन अज्ञात चोरट्यांनी एका दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून सुमारे २४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लुटून पळ काढल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, किरण प्रभाकर पाटील (वय ५०, रा. राम मंदिर वार्ड, भुसावळ) हे भुसावळ येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी ते चोपडा येथून २४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम एका बॅगेत घेऊन दुचाकीने भुसावळकडे निघाले होते. चोपडा–यावल रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली.
चोरट्यांनी पाटील यांना चाकूचा धाक दाखवून धमकावत त्यांच्या हातातील रोख रकमेची बॅग हिसकावून वेगाने पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटील हादरून गेले. त्यांनी तत्काळ पावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून, आरोपी ज्या दिशेने पळून गेले त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर धागेदोरे तपासण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भररस्त्यात घडलेल्या या धाडसी लुटीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Post a Comment
0 Comments