Type Here to Get Search Results !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283


परभणी ज़िल्हा प्रतिनिधी 

सो. योगिता मनोहर मोपकर (रिसोडकर )


*सेंड बॅक विद्यार्थ्यांनी 20 मार्च पूर्वी त्रुटीपूर्तता करावी*


परभणी दि. 4 (जिमाका) : शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या/प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सेंड बॅक अर्जदारांना अंतिम सूचना देण्यात आली आहे.


इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध स्तरावरील महाविद्यालये/शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन स्वीकारण्यात आले होते.


परभणी जिल्ह्यातून एकूण 3 हजार 11 अर्ज प्राप्त झाले असून तपासणीअंती 1 हजार 364 अर्ज विविध त्रुटींमुळे संबंधित विद्यार्थ्यांकडे सेंड बॅक करण्यात आले आहेत. 


नवीन अर्जासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणे अथवा कागदपत्रे अस्पष्ट असणे, नूतनीकरण अर्जासाठी मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड न करणे तसेच त्रुटींची पूर्तता न करता अर्ज सादर करणे ही प्रमुख कारणे आढळून आली आहेत. 


सेंड बॅक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ https://hmas.mahait.org⁠ या पोर्टलवर लॉगिन करून अर्जातील त्रुटींची ऑनलाईन पूर्तता 20 मार्च 2026 पर्यंत करावी. तसेच त्रुटीपूर्तीनंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची हार्ड कॉपी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी येथे सादर करावी. 


निर्धारित मुदतीत त्रुटीपूर्ती न करणाऱ्या अथवा अपूर्ण त्रुटीपूर्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज कायमस्वरूपी नाकारण्यात येतील व त्याबाबत कार्यालय कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही. शासन निर्णयानुसार एकदा नाकारलेले अर्ज पुन्हा विचारात घेण्याची तरतूद नसल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments