Type Here to Get Search Results !

जळगावात 62.07 ग्रॅम एमडी ड्रग्जसह आरोपी अटकेत; 3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



जळगाव : जिल्हा पोलीस दलाच्या गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून एकूण 62.07 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीने हे ड्रग्ज मालेगाव येथील पुरवठादाराकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुरुवारी (31 जुलै) रात्री सुमारे 10.40 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ, सेक्टर क्रमांक 14 समोरील रस्त्यावर एमडी ड्रग्जची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून परिसरात सापळा रचला. संशयित व्यक्ती ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेला एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला.


अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान (वय 36) असे असून तो मूळचा आडगाव (ता. जळगाव) येथील रहिवासी आहे. सध्या तो एमआयडीसी परिसरातील करीमनगर, फातिमा नगर येथे वास्तव्यास आहे. चौकशीदरम्यान आरोपीने जप्त करण्यात आलेले एमडी ड्रग्ज मालेगाव (जि. नाशिक) येथील रफीक उर्फ गोल्डन याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानुसार एएसआय अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून संबंधित पुरवठादाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 39.06 ग्रॅम एमडी (किंमत 1 लाख 96 हजार रुपये), 11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी (किंमत 36 हजार रुपये) आणि 18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी (किंमत 56 हजार रुपये) असा एकूण 62.07 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. याशिवाय 20 हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन आणि 50 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 3 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.


या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments