Type Here to Get Search Results !

चाळीसगावात भेसळखोरीविरोधातील कारवाई अपुरी? अन्न सुरक्षा तपासण्यांबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

 

मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक 

संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283



चाळीसगाव : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा आणि बेकायदेशीर खाद्यव्यवसायांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली असली, तरी चाळीसगाव तालुक्यात या कारवायांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याची चर्चा आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत काही कारवाया झाल्या असल्या, तरी त्या अपुऱ्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भेसळखोरीचा गोरखधंदा अद्याप सुरूच असून मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी उघड्यावर अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. याशिवाय सुटे खाद्यतेल विक्री करणारे, दूध डेअरी, मोठी हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकऱ्या, आईस्क्रीम सेंटर आणि इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची नियमित तपासणी होत नसल्याची चर्चा आहे. या ठिकाणी अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन याबाबत सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरीविरोधात धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. अनेक जिल्ह्यांत गुटखा माफिया, भेसळयुक्त अन्नपदार्थ उत्पादक आणि विनापरवाना खाद्य व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र चाळीसगावात या कारवायांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


विशेष म्हणजे, तालुक्यात गुटख्याची विक्री सुरू असल्याचे वारंवार समोर येत असतानाही अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही. दुसरीकडे, गेल्या महिन्यात पोलिसांनी गुटखा विक्रीप्रकरणी पाच जणांवर कारवाई केली होती. पोलिसांना माहिती मिळते, मात्र संबंधित विभागाला त्याची कल्पना कशी नसते, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.


याशिवाय, शहरातील किती हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकऱ्या आणि इतर खाद्य आस्थापने अन्न सुरक्षा नियमांचे पालन करतात, किती जणांकडे आवश्यक परवाने आहेत आणि किती ठिकाणी तपासणीनंतर कारवाई करण्यात आली, याची माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे. नियमित तपासण्या, प्रयोगशाळेत नमुन्यांची चाचणी आणि दोषींवर कठोर कारवाई झाल्यासच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रकारांना आळा बसेल, असे मत व्यक्त केले जात आहे.


टीप : या वृत्तातील काही मुद्दे स्थानिक स्तरावरील चर्चा आणि आरोपांवर आधारित आहेत. संबंधित प्रशासनाकडून त्याबाबत अधिकृत भूमिका किंवा पुष्टी जाहीर झालेली नाही.

Post a Comment

0 Comments