मुख्य संपादक:- सौ सुनिता राजेंद्र महाडिक
संपादक:- मुकेश राजेंद्र महाडिक
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा:- 9273165283
मुंबई : खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर लाल रंगात ‘पोलीस’ असे लिहिणे किंवा ‘पोलीस’ अशी पाटी लावून वाहनांचा वापर करणाऱ्यांविरोधात राज्यभरात कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने यासंदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच महामार्ग पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून अशा वाहनांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ही कार्यवाही नागरिक श्री. सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर सुरू करण्यात आली आहे. तक्रारीत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या खासगी वाहनांवर लाल रंगात ‘पोलीस’ असे लिहून किंवा ‘पोलीस’ अशी पाटी लावून वाहनांचा वापर करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याबरोबरच कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ‘पोलीस’ असा उल्लेख असलेल्या खासगी वाहनांची वाहतूक तपासणी अनेकदा टाळली जाते. याचाच फायदा घेत काही समाजकंटक अशा वाहनांचा वापर अवैध वाहतूक, दहशत निर्माण करणे किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी करत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे तक्रारीत अधोरेखित करण्यात आले आहे.
या संदर्भात यापूर्वीही उच्च न्यायालयाने अशा प्रकारांबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा उल्लेख अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने पाठविलेल्या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आता या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात असून राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रानुसार, खासगी वाहनांवर लाल रंगात ‘पोलीस’ असे लिहिणे किंवा अधिकृत परवानगी नसताना ‘पोलीस’ अशी पाटी लावणे हे महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १७७ अंतर्गत कारवाईस पात्र ठरू शकते. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करून संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबतची मूळ तक्रार संबंधित पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. राज्यभरात या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास खासगी वाहनांवर ‘पोलीस’ असा उल्लेख करून मिळणाऱ्या अवैध सवलतींना आळा बसेल, तसेच वाहन तपासणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments